Thursday, February 9, 2012

८ फेब्रुवारी २०१२

आजचा दिवस अनेक दुर्मिळ गोष्टी पून्हा अनुभवायला मिळण्याचा दिवस च म्हणायला लागेल. पहिले म्हणजे मुंबई मध्ये कडाक्याची थंडी आणि दूसरी म्हणजे आमच्या प्रिय आणि एकुलत्या एक पत्नी चे प्रेम पूर्ण चार शब्द. रतन झाल्या पासून आहे नाही त्या सगळ्या प्रेमाचा मानकरी तोच झालाय म्हणा माझी त्या बद्दल काही तक्रार नाहीये कारण ते अगदी स्वाभाविकच आहे पण अनपेक्षित मिळालेली आपली च हक्काची गोष्ट मनाला वेगळाच आनंद देऊन जाते.
सकाळी सकाळी नेर्लेकर चा फोन आला की त्याच्या अचानक च्या घरगुती अडचणी मूळे ज्या कामासाठी त्याला उदया नाशिकला ४ दिवस जायचे होते त्याला तो जाऊ शकणार नाही आणि त्याने मला न विचारता बॉसना माझे नाव सांगून ही टाकले आणि ते तयार ही झाले. मी यावर काय बोलणार आता मी नेर्लेकर dont worry असे सांगून मी सगळे काम सांभाळून घेईन असे आश्वासन दिले व फोन ठेवला. स्वातीला हाक मारून सगळी हकीकत सांगितली आणि तयारी करायला सांगितली.
सांगितल्या बरोबर तिने पहिले माझा स्वेटर शोधायला सुरुवात केली आणि फटक्याच्या माळेला काडी लावल्या प्रमाणे तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला." नेर्लेकर कोण आले परस्पर तुमचे नाव सुचवणारे? आणि तुम्ही ही लगेच हो म्हणलात? जणू आपल्याला काही काम च नाही असे. त्यांना घरगुती अडचणी आणि आपल्याला काहीच नाही? त्यांनी मुद्दामून तुमच नाव सुचवलं असणार तुम्हाला सर्दी चा त्रास होतो हे माहिती आहे त्यांना तरीही नाशिक च्या कडाक्या च्या थंडीत तुम्हाला पाठवत आहेत. मेला !! तुमचा फुल स्वेटर किती दिवस झाले शोधते आहे सापडत च नाहीये. आता नाशिक च्या थंडीत तब्बेत सांभाळणार की काम करणार देव च जाणे. त्यात काम करून तडक रूम वर याल तर शप्पथ नशिक च्या आहे नाही त्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रांना भेटून याल आणि मग सर्दी घेऊन बसाल घरात. तेव्हा तुमची विचारपूस करायला किंवा तुमचे कुठल राहिलेलं काम पूर्ण करायला येईल का कुणी तुमचा नातेवाईक, मित्र किंवा तो नाडकर्णी?" इतक्यात रतन ओरडला," अग !!आई नाडकर्णी नाही नेर्लेकर." मी आणि रतन जोरात फुटलो. "गप्प बसा" असे म्हणत तिने पून्हा स्वेटर शोध मोहीम सुरु केली. मला तिची अस्वस्थता आणि तगमग पहावली नाही मी तिला म्हणले, " स्वाती शांत हो नको तडतड करूस जीवाची तो स्वेटर मी अगदी नीट जपून ठेवलाय." त्यावर ती फणकारून म्हणली "तुम्ही? आणि नीट ? उगाच बंडला मारू नका आठवतोय तरी का कसा होता स्वेटर ? आत्ता माझ्या समाधाना साठी बोलताय संध्याकाळी याल पैसा उडवून नवीन स्वेटर घेऊन."
आता मी जरा चिडलो आणि उठून त्वरित माळ्या वरच्या bag मध्ये नीट ठेवलेला स्वेटर तिला काढून दिला आणि म्हणल ," बघ ठेवलाय की नाही मी जपून? अग!! साधा सुधा स्वेटर नाहीये हा माझ्या एकुलत्या एक बायको ने तिच्या हाताने विणलेला स्वेटर आहे हा. मला आत्ता पर्यंत दिलेलं सगळ्यात किमती प्रेझेंट आहे हे" आता मात्र स्वाती चा राग कुठल्या कुठे पळून गेला मला म्हणाली '" तुम्ही अजून हा स्वेटर जपून ठेवलाय? मला वाटलं कुठे तरी हरवला हा स्वेटर. रतन च्या वेळी माहेरी गेले होते तेंव्हा आई च्या मागे लागून लागून शिकले होते स्वेटर बनवायला. तुमच्या साठी आणि रतन साठी अगदी कौतुकाने स्वेटर केला आणि त्या नंतर कधी थंडीच पडली नाही. आई ने शिकवलेली ही शेवटची गोष्ट पूर्ण झालेला स्वेटर बघायला ही बिचारी थांबली नाही अचानक च निघून गेली ती कधी च परत न येण्यासाठी ." आता तर अतिशय अवघड प्रसंग माझ्या समोर सुरु झाला स्वाती रडू लागली. मला कुणी रडू लागले त्यातल्या त्यात कुणी स्त्री आणि ती ही स्वाती रडू लागली कि काय बोलावे ते कळतच नाही. पण मी तिला थांबवले नाही कधी कधी भावना मनात साठून राहण्या पेक्षा बाहेर पडून गेल्या कि मन मोकळ होत.
मग रतन ला हाक मारली आणि आणि काय करायचं ते समजावलं. मग काय आई च बाळ तिच्या कुशीत शिरून तिला विचारू लागलं, "आई तू homework नाही केले म्हणून बाबा नी मारलं तुला ? जशी तू मला मारतेस आणि म्हणून तू रडतेस जसा मी खोटा खोटा रडतो ? " स्वाती जरा हसली. त्या नंतर चिरंजीवांनी जरा over acting ला सुरुवात केली पठ्ठा म्हणतो काय? ," आई हे अन्याय करणारे बाबा आपल्याला नको आपण दुसरे प्रेमळ बाबा आणू " आता मात्र स्वाती खदखदून हसायला लागली. दोन मिनिटा साठी कार्ट्याला झोडपून काढावस वाटले पण स्वाती चे हसणे पाहून विचार बदलला.
स्वाती रतन ला शाळे साठी तयार करण्या साठी आत निघून गेली. जाताना मला म्हणली ," निघा आता ऑफिस ला उशीर होईल आणि संध्याकाळी लवकर या आणि हो reservation करून या उदयाच."
संध्याकाळी घरी आलो तेंव्हा माझी सगळी तयारी केलेली होती शिवाय स्वेटर ही छान धुवून घडी घालून ठेवला होता. "हे काय स्वेटर धुवून वाळला सुद्धा?" मी आश्चर्याने विचारले? रतन म्हणाला ,"आई ने शिंदे काकूंच्या Hairdryer ने सुकवला आहे स्वेटर" इतक्यात स्वाती बाहेर आले आणि तिने रतन ला बाहेर पिटाळले. मी काही बोलणार इतक्यात म्हणली," आभार प्रदर्शन नकोय मी काहीही जगावेगळ केलेलं नाहीये. तुमच्या तब्बेतीची काळजी वाटते म्हणून सकाळी बडबडले. आणि हो या डब्यात नारळा च्या वड्या केल्यात .तुमच्या मित्रांच्या आणि बाकीच्या नातेवाईक यांच्या घरी नेण्या साठी." असे म्हणून तिने खोबऱ्याच्या वडी ची वाटी हातात दिली म्हणली,"सांगा कश्या झाल्यात?"
आजू बाजूला रतन नाही हे पाहून मी तिला भरवायला सांगितले. पहिले बरेच आढेवेढे घेतले पण नंतर पटकन भरवून लाजून आत गेली. किती वर्षांनी तिला असे पाहत होतो मनाला खूप बरे वाटले.
बायाका ही नारळा सारख्या असतात ना वरून कडक आतून खोबऱ्या सारख्या गोड!!!
पण हा नारळ दररोज फुटत नाही त्याच काय????