Monday, January 16, 2012

१५ जानेवारी २०१२

१५ जानेवारी २०१२
आज अगदी उत्साहात स्वाती ने बनवलेल्या गरमा गरम गुळाच्या पोळ्या घेऊन ऑफिस ला पोचलो. दरवर्षी प्रमाणे आज ही सगळे जण डब्यावर तुटून पडणार म्हणून मनापासून खुश होतो. पण ऑफिस चा नूर काही औरच होता. आमची सहकर्मचारी शोभा जाधव च्या नवरया चे अपघाती निधन झाले होते. शोभा म्हणजे आमच्या ऑफिस ची शान!! कोणा ची मैत्रीण, कोणाची मुलगी,तर कुणाची उत्तम सहकर्मचारी. घरच्या नाजूक परिस्थिती मूळे कॉलेज चे शिक्षण सुरु असताना तिने आमच्या कंपनी मध्ये नोकरी पकडली. प्रथम clrical काम करत करत तिने तिच्या हुशारी च्या जोरावर accounts department ला बदली मिळवली. मग माझ्या सल्ल्या ने Mcom व DTL पूर्ण केले. स्वतः लग्ना साठी पैसे जमवून लग्न केले. दीड वर्ष पूर्वी च तिला मुलगी झाली होती. सगळे इतक छान चालू असताना तिच्या बाबतीत असे काही होईल असे वाटले देखील नव्हते.
ऑफिस मधले निम्मे लोक सकाळी तर निम्मे लोक संध्याकाळी भेटायला जायचे ठरले होते. मी ऑफिस ला पोचेपर्यंत निम्मे लोक पुढे गेले सुद्धा होते तेव्हा संधयाकाळी जाण्यावाचून माझ्या कडे काहीच पर्याय उरला नाही. सगळा दिवस याच टोचणी मध्ये गेला. एरवी हसणारे,खिदळणारे ऑफिस आज एकदम शांत होते. नंतर नंतर मला त्या शांततेचा ही त्रास होऊ लागला.
अखेरीस आम्ही संध्याकाळी शोभा ला भेटायला तिच्या सासरी ठाण्या ला पोचलो. घरातला कर्ता पुरुष गेलेलं घर भयाण दिसत होते. हसऱ्या आणि बोलक्या डोळ्यांची शोभा हतबल आणि आगतिक पणे नवऱ्या च्या फोटो पुढे बसली होती. दीड वर्षाची तिची मुलगी पायाशी खेळत होती. काय कळणार तिला कि सकाळी च तिचा जन्मदाता बाप तिला सोडून गेला होता. आजूबाजूला नातेवाईकांच्या घोळक्यात बसलेली शोभा एकटीच वाटली मला. मला मोठ्या भावासारखी मानणारी शोभा, तिच्या प्रत्येक प्रोब्लेम मध्ये माझा सल्ला घ्यायची पण आज मी तिच्या साठी काहीही करू शकत नव्हतो.
चौकशी केल्यावर कळले की तिचा नवरा रात्री मित्रांसोबत दारू प्यायला गेला होता. येताना त्याच्या बाईक चा ताबा सुटला आणि एका टेम्पो वर जाऊन आदळला आणि जागी च गेला. तसा दारू चा नाद नव्हता त्याला नाहीतर शोभा बोलली असती मला. मजा म्हणून इतकी प्यायला की जीवन च गमावून बसला. तो क्षणाच्या मजे साठी शोभा ला आणि त्या लेकराला उघड्यावर टाकून गेला. गेलेल्या माणसा बद्दल वीत बोलू नये पण मला त्याचा राग आला होता त्याच्या मजेसाठी त्याला अजून दोन आयुष्य बरबाद करायचा काही च अधिकार नव्हता.
शोभा च्या घरून स्टेशन कडे निघालो येताना वाटेत मला माझे मोहाचे प्रसंग आठवले आणि ते मी टाळले याचा मला अभिमान वाटत होता. त्या मूळे अनेक मित्र गमावले होते मी पण आज त्याची खंत वाटत नव्हती मला.....स्टेशन वर आलो तर ९.०७ ची दादर लोकल ठाणे स्टेशन वर उभी च होती.रात्रीची वेळ त्यात विरुद्ध दिशेचा प्रवास तेव्हा गाडीला विशेष गर्दी नव्हती. इंजिन च्या मागच्या च डब्यात बसलो.गाडी सुरु झाली. पुढे भांडूप स्टेशन ला काही रेल्वे कर्मचारी माझ्या डब्यात चढले.
रुळांची व सिग्नल ची देखरेख करणारे ते कर्मचारी होते. त्यांच्या हातात कंदील, हातोडे आणि पहार होती. त्या मधला अतिशय वयस्कर गृहस्थ साधारण ६० च्या आसपास चा वाटत होता. अतिशय किरकोळ अंगयष्टी चा तो इसम भेलाकांड्या खात च डब्यात चढला. त्याचा खांद्या वरील हातोडी जरी त्याच्या अंगावर पडली असती तरी गेला असता इतका कृश होता तो!! तो डब्यात चढला आणि डोळे मिटून समोर च्या बाकावर बसला. त्यांचे इतर दोन कर्मचारी त्याचा शेजारी बसले. चवथ्या कर्मचाऱ्याला तिथे जागा नव्हती म्हणून तो माझ्या शेजारी येऊन बसला.
तो डोळे मिटून तो गाडीचा आवाज ऐकत होता, गाडी जाताना जरा कुठे रुळाचा वेगळा आवज त्याला जाणवला की तो सोबतच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना सांगत होता. काही वेळाने त्यांच्या मध्ये मजा मस्करी सुरु झाली. आणि विषय होता त्याची दारू. माझ्या शेजारील गृहस्थ त्याला म्हणाला," बाबा आज काम निट करनास नक्की च विदेशी पिऊन आला असशील देशी प्यायला असता तर कस झाक काम केले असतंस बघ!!!" मी न राहवून त्या इसमाला म्हणल,"अहो कशाला त्यांना अजून दारू प्यायला प्रवृत्त करताय ? अहो त्यांच वय बघा!! त्यांची अवस्था बघा! अशात त्यांना सावरायचं सोडून तुम्ही त्यांना अजून प्यायची फूस काय लावता?" माझ्या बोलण्या वर हसत हसत तो माणूस म्हणाला '"साहेब आम्ही कोण आलो त्याला फूस लावनारे ? आमचा बाबा वयाच्या १७ व्या वर्षी पासून पेतोय. आज त्याच्या इतक कष्टांच अन कसबी च काम आमी कुनी बी करू शकत न्हाय!! आज तो जो काही उभाय तो दारू मुळच नाही तर एखादा काव्हाच गचकला असता एवढे कष्ट केलेत बाबा न आमच्या..४ थी नापास हाय पण नॉलेज इतक हाय कि भले भले इंजिनियर पन बाबा कड सल्ला मागायला येत्यात. ३ पोरींची लग्न लावली आणि आज बी कष्टा नि बायाकुच अन पोलियो झालेल्या पोराच पोट भरतोय ते या दारू मुळच. पावन समदी च लोक मजा म्हणून नाय पेत दारू." एवढ बोलून ते सगळे कांजुरमार्ग स्टेशन ला उतरून गेले. भेल्कांड्या देत जाणाऱ्या त्या इसमा कडे मी पाहतच राहिलो.
एका दिवसात एकाच गोष्टीचे परस्पर विरोधी पैलू कधीच माझ्या समोर आले नव्हते. अस्वस्थ मनाने घरी आलो. पण अजून ही त्याच दोन घटना माझ्या मनात एकमेकांशी वाद घालत आहेत. शोभाचा संसार उध्वस्त करणारी दारू वाईट की त्या माणसाचा संसार उभा राहावा या साठी कामी येणारी दारू चांगली यात मनाचा पार गोंधळ उडला आहे.
मला वाटते कोणतीही गोष्ट वाईट नसते. ती आपण ज्या परीस्थिते मध्ये अवलंबतो त्यावर तिचे भवितव्य अवलंबून असते.
परमेश्वरा माझ्या वर अशी वेळ आणू नकोस रे बाबा!!! आणि आली तरी अशा कशा चा ही अवलंब न करता ती लढायची ताकद दे.... पण देवा तुम्ही का स्वर्ग मध्ये सोमरस पिता काही प्रोब्लेम आहे की.....???

Wednesday, January 11, 2012

२ जानेवारी २०१२
आज २०१२ चा दुसरा पण ऑफिसचा मात्र पहिला दिवस होता.काहीसा अनिच्छेने ऑफिसला पोहोचलो.डोळ्यासमोर कामाचा डोंगर दिसत होता.पण जेव्हा ऑफिसला पोचलो तेव्हा ऑफिसचा सुर काही निराळाच होता. सगळ्या ऑफिसला सुंदर पाने सजवले होते जणू कोणाचा तरी वाढदिवसचं होता.पण मला काही लक्षात येईना कोणाचा वाढदिवस आहे.मला काही झेपत नव्हते.मी जाऊन जागेवर बसलो तोच HR मधला सातपुते सांगायला आला म्हणाला,"बोरकर चला conference room मध्ये चला आज कुणीही काम करायचे नाही आज सगळ्याना एक surprize आहे"मी conference room मध्ये गेलो बघतो तर साधारण ५- १२ वयाची जवळ जवळ ३०-३५ मुले तिथे आली होती.आमच्या कंपनीने एक आख्खा अनाथ आश्रमच दत्तक घेतला होता. आणि ही सगळे मुले त्याच अनाथ आश्रमा मधली होती. सगळा दिवस ती मुले आमच्या बरोबरच राहणार होती. दिवस भर मस्त कार्यक्रम ठेवले होते आणि म्हणूनच आजचा दिवस कोणीही काम करायचे नव्हते.
मनातली मरगळ,कामाचे tension कुठल्या कुठे पळून गेले.
मग आम्ही सगळे त्या मुलांबरोबर खेळलो, चित्रे काढली, मातीच्या वस्तू बनवल्या,दुपारी त्यांच्या बरोबरच जेवलो,संध्याकाळी त्या मुलांना कंपनी कडून शालेय साहित्य देण्यात आले आणि आम्ही सर्वांनी वेगळे पैसे जमवून त्यांना आवश्यक असा प्रेशर कुकर ही त्यांना दिला.मुले तर जशी आनंदानी फुलुनच गेली होती.सहज बोलता बोलता त्यांना विचारलं कि त्यांना मोठे पाणी काय व्हायायाच आहे.तर इतकी सुंदर उत्तरे त्यांनी दिली कुणी म्हणाले आर्मी मध्ये जाणार, कुणाला microsoft मध्ये काम करायचं होते तर एका मुलीला चक्क अनाथ आश्रमाच्या ताई प्रमाणे अनाथ मुलांना सांभाळायच होते. एक एक मुलाचे विचार ऐकून क्षणभर मनात प्रश्न पडला कुठून आणि कशी या मुलांना समाज येत असेल देव च जाणे. मग वाटले ही पिढीच अशी आहे.
ट्रेन मधून जाताना मनात विचार आला कि रतन चे ही असेच काही स्वप्न असेल तर आपण त्याला सर्वतोपरी सहकार्य करायचे रात्रीचा दिवस करून मेहनत करायची पण त्याला त्याचे स्वप्ना पूर्ण करता आली पाहिजे. जर त्याने सी ए केले तर मी समजेन कि मी च त्याच्या रूपाने सी ए झालोय.अचानक पाने भारावून गेलो आणि कधी घरी आलो ते कळलेच नाही.
घरी आलो तर स्वाती आणि रतन जब वुई मेट हा सिनेमा पाहत होते. मी चार चार दा सांगितल्या नंतर माय लेक TV समोरून उठले. स्वाती आत स्वयपाक करू लागली.मी रतन ला म्हणल चल आज मी तुझा अभ्यास घेतो .असे म्हणाल्या बरोबर रतन आणि स्वाती ४४० vault चा झटका बसल्या प्रमाणे बघत राहिले.स्वाती ने रतन ची वह्या पुस्तके मला दिली. तो त्याचा त्याचा अभ्यास करू लागला. मला खदखदत असणारा प्रश्न अखेर मी रतन ला विचारला," रतन मला सांग तुला मोठा झाला कि काय व्हायचं आहे?"
त्यावर क्षणाचा ही विलंब न करता तो म्हणाला," ह्रिथिक रोशन" जी उत्तरे माझे कान ऐकून आले होते त्यात हे उत्तर दूर दूर वर ही नव्हते.हे ऐकल्या बरोबर स्वाती मात्र शिवबा ने गड जिंकल्या नंतर जिजाऊ ज्या आनंदाने बाहेर आल्या असतील त्या आनंदाने आली आणि रतन कडे पाहू लागली त्याला म्हणाली,"तू star आणि मी तुझी starmother हो हो जरूर हो अरे ह्रीथिक काय? त्याच्या ही पेक्षा मोठा star होशील तु?" मी माय लेकाचा कौतुक सोहळा पाहून थक्क झालो.मी स्वातीला म्हणल,"आग स्वाती काय हे? तो काही तरी वेड्या सारखा बोलतोय आणि त्याला ओरडायच सोडून त्याला खतपाणी घालते आहेस.आपल्याला झेपतील अशीच स्वप्ने पहावीत माणसाने" पण ती काहीही ऐकायच्या मनस्थितीच नव्हती. तिने मला चं पटवून द्यायला सुरुवात केली कि रतन मध्ये कसे स्टार होण्या चे कलागुण आहेत आणि स्टार चे आई वडील किती सुख आणि प्रसिद्धी चा आनंद उपभोगतात.या सगळ्या मध्ये रतन मात्र मस्त पैकी आमची नजर चुकवून खाली खेळायला गेला. गेला तो गेला आणि थेट जेवायला चं उगवला. मग काय जेवला आणि सकाळ ची शाळा म्हणून स्वाती आणि रतन झोपून गेले. आणि मी ही दोघा समोर हात टेकले.
पण माझ्या संकल्पाला पहिल्याच दिवशी इतका चांगला प्रसंग लिहायला मिळाला या विचाराने मन खुश झाले. नवीन कोऱ्या डायरीच्या पानावर खूप दिवसांनी "मराठी" मध्ये काही तरी लिहितो आहे. दिवसभर त्या मुलां बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण त्याचे सुख शब्दात मांडणे खरच अशक्य आहे. पण आज मनाला खात्री वाटते आहे की हे वर्ष छान जाणार कारण सुरवात चं इतकी सुंदर आणि आशादायक झाली आहे.आज कोणी तरी माझ्या मुळे आनंन्दी झाले होते. आज एका जीवाला तरी माझ्या मुळे त्याचे भविष्य एक चांगले नागरिक म्हणून जगायला मदत होणार आहे हे समाधान येणाऱ्या सुखी वर्षाची चं नांदी आहे. चला आता मात्र झोपायला हवे उद्यापासून month end चे काम नवीन जोमाने करायचे आहेत.भगवंता देणार असशील तर येणारा दिवस सहन करायची शक्ती दे रे बाबा !!!
प्रास्ताविक...
जेव्हा मी ब्लॉग लिहू लागलो तेव्हा काही दिवसांनी जाणवले कि आपल्या अवती भोवती च्या बऱ्याच गोष्टी बद्दल अनेक जण आपापल्या दृष्टीकोनातून लिहित असतात. आपण जे विचार मांडतो त्यातून आपले व्यक्तिमत्व समोर येते आणि मग विचार केला जर घटना एक पण त्यावर विचार करणारे,मत मांडणारे व्यक्तिमत्व जर वेगळे असेल तर किती मजा येईल ना?
म्हणून या नवीन वर्षा मध्ये मुंबई मध्ये राहणारे श्रीयुत बोरकर आपल्या भेटील...ा त्यांची डायरी घेऊन भेटायला येणार आहेत.तसे बोरकर अगदी सर्व सामान्य सारखे चाकरमाने आहेत तेव्हा रोज डायरी लिहिणे त्यांना परवडणारे नाहीये पण त्यांनी या वर्षी एक संकल्प केला आहे कि ज्या दिवशी त्यांना एखादी संस्मरणीय घटना आपल्या आयुष्यात झाली आहे असा साक्षात्कार होईल त्या दिवशी ते नक्की डायरी लिहिणार आहेत आणि पर्यायानी तुम्हाला हि ती वाचायला मिळेल.
खर म्हणजे बोरकर ही व्यक्तिरेखा मला "व पु काळे" यांच्या "मायाबाजार" या कथेत सापडली जेव्हा मी कॉलेज मध्ये नाटक करत होतो तेव्हा. त्या वेळेस आम्ही भूमिके चा अभ्यास नीट व्हावा म्हणून त्या त्या पात्राची डायरी लिहायचो.त्या वेळी त्या पात्राच्या दृष्टीने विचार करताना आणि शब्दात मांडताना वेगळीच मजा यायची.ती मजा तो आनंद पुन्हा अनुभवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे. माझी आशा आहे की तुम्हाला ही तो नक्की आवडेल याची मला खात्री वाटते आहे.तेव्हा आज पासून बोरकर तुमच्या भेटीला येतील हे नक्की.
बर बोरकरां बद्दल सांगायचे झाले तर नाव आनंद विलास बोरकर वय ४० वर्षे राहणार दादर मधील चाळ वजा बिल्डींग मधे.घरात त्यांची पत्नी स्वाती आहे जी उत्तम "चाळ गृहिणी"(आता चाळ गृहिणी म्हणजे तिच्यात कोणते गुण असतील हे वेगळे सांगायला नको... असो...) त्यांना एक मुलगा आहे दहा वर्षांचा जो त्यांना लग्नाच्या ५ वर्ष नंतर झाला असल्याने त्यांच्या पत्नीने त्याचे नाव "रतन"ठेवले(खर तर त्याना त्याचे नाव"कोहिनूर"किंवा"हिरा"ठेवायचे होते पण त्याची तहान त्याने रतन या नावावर भागवली)तर असे आहे बोरकरांचे छोटेसे कुटुंब.अजून बोरकरां बद्दल सांगायचे झाले तर बोरकर बी. कॉम. पर्यंत शिकले नंतर सी.ए.चे शिक्षण ही सुरु केले परंतु वडिलांचे निधन आणि घरच्या परिस्थितीमूळे ते अर्ध्यात सोडले व एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी पकडली जे ते अजून ही इमानदारीने करत आहेत. तर असे हे बोरकर ना जुन्यातले जुने ना नव्यातले नवे...मधेच कुठेसे अडकलेले.ना जुन्या विचारांना सोडता येते ना नवीन विचार आत्मसात करता येतात. त्यांची ही डायरी. त्यांचा दृष्टीकोन,विचार,व्यथा,घुसमट कुठे तरी तुम्हाला ही आपल्याश्या वाटतील.तेव्हा या पुढचा प्रवास बोरकरांच्या डायरी च्या एका पानावरून पुढे सरकेल ज्या मध्ये तुमची साथ अतिशय मोलाची आहे आणि जी तुम्ही द्याल अशी मला आशा आहे.....
अधिष