Wednesday, November 28, 2012

१७ नोवेंबर २०१२

१७ नोवेंबर २०१२
आज शनिवार तसा सुट्टीचा दिवस पण इतर सुट्टीच्या दिवसा सारखा प्रसन्न न जाता जीवाला टोचणी लावूनच गेला. गेले  काही दिवस T V ला  जी बातमी येऊ नये असे वाटत होते ती अखेर आली बाळासाहेब ठाकरेंच अखेरीस निधन झाल. सगळी कडे शोक पसरला त्यातात्ल्या त्यात आम्हा दादरकराना साहेबांचा विशेष जिव्हाळा आणि सहवास ही तेव्हा अजूनच वाईट वाटले.
रतन आणि स्वाती २ दिवस TV  समोर अक्षरश: ठाण मांडून बसले होते. बाळासाहेबांच्या प्रकृती ची चौकशी करण्यासाठी,  कोण कोण सिने कलावंत येत आहेत हे पहायला. या मायलेकांना सिनेमा बाहेर च जग कधी दिसणार आहे कुणास ठावूक ? असो कालाय तस्मै नम: 
पण मला आठवण आली त्या दिवसांची जेंव्हा मला आप्पा दसरा मेळावा किंवा इतर बाळासाहेबांच्या सभांना घेऊन 
जायचे.कधी काळी त्यांच्या भाषणांनी स्फूर्ती घेऊन शिवसेनेत सहभागी होऊन समाजासाठी काही तरी करायचा 
निश्चय मी कधी काळी केला होता. तो निश्चय केवळ निश्चय च राहिला म्हणा. एकदा आप्पांच्या एका मित्राच्या ओळखीने बाळासाहेबांच्या पायां पडण्याच भाग्यही मिळाल होत. या सगळ्या गोष्टी आठवल्या कि अस वाटत  अस  बालपण  अश्या  आठवणी  रतन  ला  कधीच  मिळणार  नाहीत  आणि मिळाल्या तरी त्याला त्याच कितपत गांभीर्य  वाटेल  हा  भाग  वेगळाच  आहे  म्हणा  ही  पिढीचतशी आहे.
पण आज चाळीतही कुणीतरी घरच गेल्या प्रमाणे मरणकळा पसरली होती. दिवाळीचा   सारा  उत्साह  चैतन्य  सार एका क्षणात हरपून गेल.आता उद्या ज्या शिवाजी पार्कात आम्ही खेळलो ,बागडलो,बाळासाहेबांची दसरा 
मेळाव्याची भाषणे पहिली तिथे त्यांना अग्नी देताना पाहण  खरोखरीच असह्या होणारे. पण काळ कुणासाठी कधीच थांबत नाही हे खर....    

Thursday, August 23, 2012

२२ ऑगस्ट २०१२

आज कालची पोर कधी काय करतील याचा नेम नाही. काल रात्री रतन ने शिवाजी पार्क वर सापडलेल कुत्र्याच पिल्लू घरात आणल आणि माझ डोकच उठल. म्हणजे दरवेळेस जेंव्हा तो पार्क मधून येतो तेंव्हा येताना हात पायाला जखमा, मळके कपडे, कुणाच्या तक्रारी घेऊन येतो त्याची आम्हाला आता सवय झाली आहे. पण काल आला तो ते कुत्र्याचे पिल्लूच घेऊन. घरी आलो तेंव्हा रतन आणि  सगळी चाळीची पोरे कुत्र्याला घेऊन वरांड्यात खेळवत बसली होती. मला वाटल दुसर्याच कुणाच असेल पण रात्री घरीच घेऊन आला. मग त्याला आमच्या बरोबरीने जेऊ घातलं, झोपायला अंथरूण घातलं. काय काय उच्छाद चालू होते रात्रभर. मी ओरडलो देखील परंतु चीरांजीवांनी मातोश्रींची परवानगी घेतल्यामुळे आमचे काय चालणार.
सकाळी उठल्याप्सून त्याच्याच मागे होता. स्वतःची शाळेची तयारी सोडून त्याच्याच मागे होता. स्वतः बरोबर त्याला पण आंघोळ घातली पठ्ठ्याने. पिल्लू क्या क्या करून ओरडत होत पण हा काही थांबला नाही. माझ तर डोकच उठल. कसाबसा ऑफीसला पोचलो. माझा वैतागलेला चेहरा पाहून सावंत ने विचारले काय झाले मी मग सगळी हकीकत सांगितली. म्हणल  आता या कटकटी पासून सुटका कशी होईल ते तूच सांग. मला म्हणला, "आज रतन शाळेतून यायच्या आत घरी जा कुत्र्याला पिशवीत घाल आणि दादर स्टेशन च्या पलीकडे सोडून ये म्हणजे झाल रतन ला सांग कुत्र बाहेर खेळता खेळता निघून गेल." मला हा उपाय अतिशय आवडला. नवीन उत्साहाने कामाला लागलो. आणि कामाच्या नादात लवकर निघायचं विसरूनच गेल. जस  लक्षात  आल  तसा  पटकन  निघालो  कधी नव्हे ते स्टेशन पर्यंत रिक्षा केली.
घरी जाऊन पाहतो तर काय चाळीच्या जिन्यातच रतन शाळेतल्या मित्रां सोबत बसला होता. अवती  भवती   सारी  शाळेची पोर आणि मध्ये कुत्र्याचे पिल्लू. रतन त्यांना सांगत होता ,"तुम्ही कायम मला चिडवायचा ना कि तुला कुणी बहिण, भाऊ नाही, आपला भाऊ किंवा बहिण च आपला best  friend  असतो आज पासून  मला पण लहान भाऊ आहे हाच माझा भाऊ मी याच नाव पण ठेवलय "मन्या" आता आम्ही रोज खूप खेळणार, मस्ती करणार "
त्याचे ते बोलण  ऐकल आणि माझा सारा विरोधच मावळला. खरच जर आर्थिक सुबत्ता असती तर रतन ला एक भाऊ किंवा बहिण नक्की देऊ शकलो असतो. पण पोराने हा प्रश्न किती सहज आणि चुटकी सरशी मिटवला. अचानक पिल्लू गोंडस वाटू लागल. म्हणल जाऊ दे पाळूदे पोराला पिल्लू .एक पोर जन्माला घालून मोठ करण्याच्या खर्चापेक्षा हा खर्च कित्येक पटीने कमी आहे. विचार पक्का केला आणि पोरांची गर्दी बाजूला करत घरी आलो.
सौभाग्यावातीना म्हणल आज काहीतरी गोड धोड करा आज आपल कुटुंब चौकोनी झालय.

Thursday, August 9, 2012

८ ऑगस्ट २०१२

८ ऑगस्ट २०१२
आज ऑफिस मधून घरी आलो तोच चाळीतल वातावरण बदलेल होत. सर्व  २-३ , २-३जणांचा घोळका करून काहीतरी कुजबुजत उभ होत. घरी  गेलो  तर  स्वातीचा चेहरा  हि  काहीसा  tension  मध्ये  दिसला  मी  व्विचाराल  काय  झाल  तसा  तिने  सारा  प्रसंग  सांगितला  आणि  हादरून  च  गेलो.  चाळीतल्या सावंत वाहिनी म्हणजे स्वातीची कंठश्च मैत्रीण नंदा चा मोठा मुलगा समीर सकाळ पासून घरातून गायब होता. नुकताच बारावीची परीक्षा दिलेला समीर आमच्या सगळ्यांचाच लाडका होता. अगदी अतिहुशार नाही की अगदी ढ म्हणण्यासारखा हि नाही  बारावीला  1st class ने पास झालेला.  सकाळी म्हणे  त्याने engineering दिलेल्या CET  च्या  result च्या basis वर कोणते कॉलेज allot   झाले  आहे  हे  जो बघायला गेला तो आलाच नाही. दुपार पासून नंदा वाहिनी  शोधाशोध  करत  फिरत  होत्या  बिना  नवर्याची  बी एकटी  कुठे  कुठे  पुरणार.  तरी चाळीतली इतर पोर आणि बाकीची माणसे मदतीला लागली. मित्र, नातेवाईक, कॉलेज सगळे शोधून झाले पण पठ्ठ्याचा काही पत्ताच नाही.  शेवटी  पोलिसात  तक्रार  नोंदवून  सगळी चाळीत परतली. ऐकून मला सुन्नच व्हायला झाल. स्वाती नंदाला आणि इतर नातेवाईकांना जेवणाच देऊन आली. एरवी  गाजब्जाणारी  आमची चाळ अगदी  चिडीचुप्प होती.
साधारण  अकरा  च्या सुमारास गलका ऐकू आला म्हणून मी आणि स्वाती बाहेर जाऊन पाहू लागलो. एका पारशी दाम्पत्या सोबत जखमी समीर चाळीत दाखल झाला होता सर्वांनी त्याच्या भोवती एकच गराडा घातला. डोक्याला हाताला,पायाला अनेक जखमा झाल्या होता एक पाय ही fracture  झाला होता. नंदा वाहिनिना तर काय कराव काय नाही सुचत च नव्हत.
सकाळी  result पाहायला बाहेर पडलेल्या समीर ने जेंव्हा पहिले कि त्याच्या score ला त्याला कुठलेही कॉलेज allot ch झाले नाहीये आणि आता जर admission घ्यायची असेल तर त्याच्या विधवा आईला लाख्खो रुपयांचे donation द्यावे लागणार आहे जे शक्य नाही. आणि ते जर शक्य नाही तर त्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही या विचारात रस्ता ओलांडत असताना एका पारशी जोडप्याच्या गाडी खाली आला. ते पारशी जोडप अतिशय चांगल त्यांनी त्याला दवाखान्यात नेला आणि शुद्धीत आल्यावर त्याला घरी आणून सोडले. समीर ची ती अवस्था आणि नंदा वहिनींचा आक्रोश पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. ज्याला जेवढे शक्य झाले त्या परीने प्रत्येकाने नंदा वाहिनीना समजावले आणि घरी गेले. मी आणि स्वाती ही घरी आलो.
हातात शाळेचे पुस्तक घेऊन रतन ला झोप शांत झोप लागली होती. या गळचेपी करणाऱ्या स्पर्धेच्या जगाशी अजून बिचार्याचा काहीच संबंध आला नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहून मनापासून tension आल आपल पोरग या स्पर्धेत कसा टिकेल? स्पर्धेत तो कुठ मागे तर नाही पडणार ना ?या आणि अनेक प्रश्नांनी डोक भांडवून गेल. बघू आता येणारा काळच याची उत्तरे देईल आता तरी त्याच्या चेहरया वरचे हसरे निरागस भाव डोळ्यात साठवून घेतो कुणास ठावूक नंतर मिळतील की नाही कालाय तस्मै नमः

Tuesday, April 24, 2012

२३ एप्रिल २०१२

२३ एप्रिल २०१२
आज बर्याच दिवसांनी डायरी लिहायला वेळ मिळाला. काल एकदाचे ऑडीट संपले अन आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. दर साला बाद प्रमाणे सगळे ऑडीट Final मी केले aani सही साठी साहेबाकडे गेले. ऑडीट करायला आलेल्या नवीन CA ला तो मोठा धक्का होता मला म्हणाला" मुझे तो लगा था आप ही Sign करोगे" तेंव्हा त्याला मी CA नाही केवळ CA Inter पास आहे हे सांगताना खूप त्रास झाला. तो बिचारा गोंधळून निघून गेला पण माझी जुनी जखम पुन्हा ओलावली.
आज दिवस भर आप्पांची खूप आठवण आली. आप्पा जर अचानक गेले नसते तर मला माझे CA  चे शिक्षण अर्ध्यावर सोडून नोकरी धरावी लागली नसती. आप्पांना मला CA होऊन ऑडीटर झालेलं पहायचं होत. पण त्यांची तेवढी अखेरची इच्छा देखील मी पूर्ण करू शकलो नाही. खर तर मनीषा च्या लग्नानंतर मला CA पूर्ण करता आल असत पण तेंव्हा आई गेली अन आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो. मग एका मागून एक वाढलेले व्याप त्याच्यासाठी आर्थिक तरतूद करता करता माझ CA करायचं स्वप्न राहून च गेल.
पण आज वाटत या सगळ्या समजुती आहेत मी माझ्या मनाला घातलेल्या. खर म्हणजे माझी जिद्द आणि चिकाटीच कमी पडली. आप्पांचा मृत्यू ही सबब न होता ती माझी प्रेरणा व्हायला हवी होती. पण अखेर ती झाली नाही  आणि आज कितीही मनात आणल तरी रतन च्या मांडीला मांडी लावून मी  अभ्यासाला बसू शकेन असे खरच वाटत नाही. 
CA च काय पण अशा अनेक गोष्टी जिथे मी जरा तग धरला असता तर काश आज जिंदगी का रुख कुछ और होता. असो पण आत्ता देखील जे काही चालू  आहे तेही काही वाईट नाही. अनेकांच्या लेखी तेही सुख नाही. तेंव्हा जे काही चालू आहे ते उत्तम च चालू आहे हेच खर. कारण ह्या आयुष्याच चांगल वाईट  घडवण हे तुमच्याच हाती असत. जे काही घडल अथवा नाही घडल हे सर्वस्वी तुमच्या निर्णयांच फलित आहे आणि त्याचा आदर राखण ही फक्त तुमची आणि तुमची च जवाबदारी आहे.
पण ज्या तडजोडी मला कराव्या लागल्या त्या मी रतन ला नाही करून देणार त्याला हव ते त्याला करून देणार अगदी पोरग अभिनयात जाणार म्हणल तरी काळजावर दगड ठेवून त्याला पूर्ण पाठींबा देणार कारण तेच तर आई वडिलांचं कर्तव्य असत. बाकी CA होण आमच्या खानदानात च लिहिलेलं दिसत नाहीये. मला इच्छा होती तर परिस्थिती अनुकूल नव्हती तर आमच्या चिरंजीवाना परिस्थिती अनुकूल असून दूर दूर वर इच्छा च नाही.

कालाय तस्मै नम: !!!!!

Wednesday, March 21, 2012

२२ मार्च २०१२

आज सकाळी मस्त पैकी पेपर उघडला आणि उडालोच सगळा पेपर गुढीपाडव्या निमित्त च्या ऑफर्स नी भरला होता. डोक्यात लख्ख उजेड पडला स्वाती ला मागच्या महिन्यात गुढीपाडव्याला नवीन Food  Processor  घेऊन देईन असे कबूल केले होते आणि ते मी पूर्णतः विसरून गेलो होतो. मी मनात म्हणल "बोरकर आता तुमची खैर नाही. एक तर तुम्ही साफ विसरलात त्यात पैशांची ही काही सोय केली नाहीये जेणे करून उद्या तरी जाऊन Food  Processor   घेता येईल. उद्याचा पाडवा काही धड होत नाही आता" पेपर तसाच ऑफिस च्या पिशवीत टाकला जेणेकरून स्वाती ची त्यावर नजर नको पडायला. पटकन आवरले आणि स्वाती ला कमीतकमी तोंड दाखवत घरातून बाहेर पडलो.ऑफिस ला पोचलो खरा पण डोक्यात Food  Processor   चे च विचार घुमत होते. एवढी महत्वाची गोष्ट कशी विसरलो आपण याचा माझा मलाच खूप राग आला. तसं बघायला गेल तर तिची मागणी अवाजवी नव्हती बिचारी लग्न झाल्यापासून  तिच्या  मामाने  लग्नात  दिलेला  च  साधा  mixer वापरत होती. मागच्या महिन्यात त्या बिचाऱ्याने मान टाकली ती ही अशी कि जी दुरुस्त न होण्या सारखी होती. त्यात च  शेजारच्या  करंदीकर  वहिनींनी  स्वातीच्या  डोक्यात  भुंगा  सोडलं  की  आता  साधे  mixer   वगैरे घेत बसू नकोस  All  In One  Food  Processor  च घे. त्यांनी फुकट चा सल्ला दिला पण झाल आता माझ्या खिशाला बसणार होती. मी ही अगदी छातीठोक पणे सांगितले या महिन्यात नको गुढीपाडव्या च्या चांगल्या मुहूर्तावर घेऊ. मुहूर्त वगैरे काही नाही मला पैशांची जोडणी करायला वेळ पाहिजे होता एवढच. आता ऑफिस मधून advance  घ्यायचा तर त्याला ही २ दिवस लागणार होते आणि बाकी च्या कोणाकडे ही मागायची सोय नवती कारण सगळ्यांचेच काही ना काही खरेदी चे plans होते. मोठ्ठ्या निर्धाराने मनाची तयारी केली आणि शिव्या खायच्या दृष्टीने च घरी गेलो मुद्दाम जरा उशिराच गेलो.
गेलो तर रतन एकटाच बाहेर TV बघत बसला होता.विचारल आई कुठाय तर म्हणला बाहेर गेलीये मी सुटकेचा निश्वास सोडला पटकन जेऊन स्वाती यायच्या आत झोपून टाकव म्हणून पटकन स्वयपाक घरात गेलो तर ओट्यावर मोठ्ठे पांढरे box होते. काय आहे म्हणून उघडून पहिले तर आत नवा कोरा Food  Processor  होता. मला क्षणभर वाटले की मी स्वप्नात आहे. म्हणून मी मागे फिरलो तर स्वाती आणि रतन माझी मजा बघत स्वयपाक घराच्या दारात हसत उभे होते. मला अगदी च खजील झाल्या सारखे झाले. रतन म्हणला," बाबा तुम्ही सकळी पळालात पण आई नी आणि मी जाऊन आणला नवीन Food  Processor  आता आई रोज मला यावर नवीन नवीन गोष्टी करून देणार आहे." असे म्हणून तो बाहेर खेळायला गेला. मी नजरेने च विचारल याचे पैसे कुठून आणलेस ? त्यावर बाईसाहेब म्हणल्या " बोरकर तुम्ही विसरलात पण मी नाही. मला  कालच  भिशी  लागली.  त्याच  पैशांनी हा Food  Processor  घेतला. खर तर सकळी च सांगणार होते पण तुम्ही मला मस्त पैकी शेंडी लावून ऑफिस ला पसार झालात. म्हणून मी पण म्हणल तुम्हाला ही जरा  आश्चर्याचा  धक्का  द्यावा  म्हणून तुम्ही यायच्या वेळेला शेजारी जाऊन बसले. कस आहे तुम्ही  जेवढी  दुष्ट,  कुचकी,  तापट  आणि अडाणी समाजता मला तेवढी मी नाहीये. तुमच्या अडचणी कळतात मला." हे म्हणजे अगदी पहिल्या बॉल वर दांडक उडवल्या सारखी माझी अवस्था झाली. आता काय आणि कस बोलू मला सुचत च नव्हत. ते काम ही तिनेच सोप्प केल मला म्हणली. " अस समजू नका बर का की तुमचा खर्च वाचला. दर महिना ५०० रुपये हिशोबाने व्याजा सकट वसूल करणार आहे मी याचे पैसे. आणि हो अस समजू नका तुमच्या जीभे चे चोचले पुरवण्या साठी हा Food  Processor  घेतलाय हा मी माझ्या रतन च्या फर्माइशी पूर्ण करण्या साठी घेतलाय. उद्या पूजा करून यावर च सगळा स्वयपाक करणार आहे."  
मी हसून तिला संमती दिली आणि ती मला Food  Processor  ची features  दाखवू लागली.
स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंत काळाची माता असते हेच खर.....

Tuesday, March 6, 2012

२९ फेब्रुवारी २०१२

आजचा दिवस काहीसा नकारात्मक भावनेने च सुरु केला कारण एक तर आज २९ फेब्रुवारी म्हणजे बाकी च्या फेब्रुवारी महिन्यात पगार लवकर मिळायचा जो आनंद होत असतो त्या च्या मधला मोठ्ठा अडसर आणि दूसर म्हणजे आज आम्हाला हीच्या आत्या कडे डोंबिवली ला जेवायला बोलावले होते. एक तर ही च्या आत्याना  ऐकू कमी येत आणि मी गेलो कि त्यांना गप्पा मारायचा एकदम चेव येतो आणि ओरडून बोलून बोलून माझा घसा मात्र कामातून जातो.
तेंव्हा आज ऑफिस मधून हाफ डे राजा टाकून घरी आलो. पाच ला रतन शाळेतून आल्या बरोबर लगेच निघालो. लवकर निघालो त्यामुळे ट्रेन ला ही जास्त गर्दी मिळाली नाही.मी रतन आणि स्वाती बसलो होतो. तोच तिथे रतन च्या च वयाचा एक मुलगा हातात काही बाराखडी, गोष्टींची आणि चित्रे रंगवण्याची पुस्तके विकायला आला. आम्ही तिघे बसलेलो बघून आमच्या सीट पाशी आला. मला म्हणाला, "साहेब देऊ का A B C D ? , गोष्टी इसापनीती...?" रतन ने स्वाती कडे आशाळभूत पणे पहिले तोच स्वाती ने त्याला डोळ्यानीच जे काय सांगायचं ते सांगितले. रतन चिडून खिडकी बाहेर पाहू लागला. तो मुलगा काही च न झाल्या प्रमाणे पुढे निघून गेला. माझी नजर मात्र त्याच्यावर च खिळून राहिली. तो प्रत्येका पाशी जाऊन विचारत होता. तो सगळा डबा पालथा घालून पुन्हा आमच्या इथून जाऊ लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं "काय रे एवढी A B C D ,गोष्टींची पुस्तके विकतो आहेस पण स्वतः शाळेत जातोस का? त्या वर तो म्हणाला " ओ साहेब घ्यायचं असेल तर घ्याना उगाच वेळ का घालवताय" असे म्हणून तो गेला. पण मला अजिबात त्याचा राग आला नाही. कारण ज्या हिम्मतीने तो न थकता कोणत्याही नकाराची परवा न करता तेवढ्याच कष्टाने पुढचा प्रयत्न करत होता. त्याच्यातली ती जिद्द, ती नकार सहन करायची शक्ती आमच्या रतन ला किमान १०% तरी मिळावी असे क्षणभर वाटून गेले.
आत्यांकडे गेलो तिथे त्यांचा US return मुलगा,त्याची बायको आणि त्यांची ५ वर्षांची मुलगी होती. सुट्टीसाठी इकडे आले होते म्हणून आत्यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते.त्यांची ती मुलगी कुठलेसे अमेरिकन चोकलेट  चघळत बसली होती. काही वेळाने ते संपले तसे तिनी भोकाड पसरले तिला तसेच चोकलेट पुन्हा हवे होते. दुर्भाग्य म्हणजे नेमके ते चोकलेट संपले होते. पोरीचे रडणे काही थांबेना आणि सगळ घर दार तिच्या मागे समजूत घालत फिरत होते. शेवटी महाप्रयत्ना नंतर ती शांत झाली आणि आम्ही जेवायला बसलो.एरवी आत्यांशी बोलून घसा दुखतो आज या पोरीने कानाचे पार बारा वाजवले.
घरी येताना ट्रेन मध्ये बसताच तो पुस्तक विकणारा मुलगा आठवला. आज एका चोकलेट च्या हटटा पायी समजूत घालणारे आम्ही सगळे तिकडे या मुलाच्या मुलभूत गरजा बघणारे ही कुणी नाही. काय तफावत आहे नाही आपल्या देशात. आपण खूपच सामान्य असल्याची टोचणी मनाला लागली स्टेशन मधून बाहेर पडलो तोच बाहेर एका नुकत्याच विजयी झालेल्या आमदाराचा विजयी मुद्रेतील मोठठां flex लावला होता. त्याच्या खाली येणाऱ्या पाच वर्षातील विकास कामांची यादी त्याने दिली होती. मनात विचार आला आपण सामान्य आहोत पण ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या तरी विकास आराखड्यात कुठे या मुलांचा विकास लिहिला आहे.
शेवटी विचार करायचा नाही म्हणल तरी डोक ऐकत नाही त्याच काय ?  जाऊदे ज्याच त्याच नशीब एवढाच आपण म्हणून शकतो.
भगवंता श्रीमंत नाही पण चांगल्या खात्या पित्या घरात जन्माला घातलेस याचे आभार रे बाबा.....

Thursday, February 9, 2012

८ फेब्रुवारी २०१२

आजचा दिवस अनेक दुर्मिळ गोष्टी पून्हा अनुभवायला मिळण्याचा दिवस च म्हणायला लागेल. पहिले म्हणजे मुंबई मध्ये कडाक्याची थंडी आणि दूसरी म्हणजे आमच्या प्रिय आणि एकुलत्या एक पत्नी चे प्रेम पूर्ण चार शब्द. रतन झाल्या पासून आहे नाही त्या सगळ्या प्रेमाचा मानकरी तोच झालाय म्हणा माझी त्या बद्दल काही तक्रार नाहीये कारण ते अगदी स्वाभाविकच आहे पण अनपेक्षित मिळालेली आपली च हक्काची गोष्ट मनाला वेगळाच आनंद देऊन जाते.
सकाळी सकाळी नेर्लेकर चा फोन आला की त्याच्या अचानक च्या घरगुती अडचणी मूळे ज्या कामासाठी त्याला उदया नाशिकला ४ दिवस जायचे होते त्याला तो जाऊ शकणार नाही आणि त्याने मला न विचारता बॉसना माझे नाव सांगून ही टाकले आणि ते तयार ही झाले. मी यावर काय बोलणार आता मी नेर्लेकर dont worry असे सांगून मी सगळे काम सांभाळून घेईन असे आश्वासन दिले व फोन ठेवला. स्वातीला हाक मारून सगळी हकीकत सांगितली आणि तयारी करायला सांगितली.
सांगितल्या बरोबर तिने पहिले माझा स्वेटर शोधायला सुरुवात केली आणि फटक्याच्या माळेला काडी लावल्या प्रमाणे तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला." नेर्लेकर कोण आले परस्पर तुमचे नाव सुचवणारे? आणि तुम्ही ही लगेच हो म्हणलात? जणू आपल्याला काही काम च नाही असे. त्यांना घरगुती अडचणी आणि आपल्याला काहीच नाही? त्यांनी मुद्दामून तुमच नाव सुचवलं असणार तुम्हाला सर्दी चा त्रास होतो हे माहिती आहे त्यांना तरीही नाशिक च्या कडाक्या च्या थंडीत तुम्हाला पाठवत आहेत. मेला !! तुमचा फुल स्वेटर किती दिवस झाले शोधते आहे सापडत च नाहीये. आता नाशिक च्या थंडीत तब्बेत सांभाळणार की काम करणार देव च जाणे. त्यात काम करून तडक रूम वर याल तर शप्पथ नशिक च्या आहे नाही त्या सगळ्या नातेवाईक आणि मित्रांना भेटून याल आणि मग सर्दी घेऊन बसाल घरात. तेव्हा तुमची विचारपूस करायला किंवा तुमचे कुठल राहिलेलं काम पूर्ण करायला येईल का कुणी तुमचा नातेवाईक, मित्र किंवा तो नाडकर्णी?" इतक्यात रतन ओरडला," अग !!आई नाडकर्णी नाही नेर्लेकर." मी आणि रतन जोरात फुटलो. "गप्प बसा" असे म्हणत तिने पून्हा स्वेटर शोध मोहीम सुरु केली. मला तिची अस्वस्थता आणि तगमग पहावली नाही मी तिला म्हणले, " स्वाती शांत हो नको तडतड करूस जीवाची तो स्वेटर मी अगदी नीट जपून ठेवलाय." त्यावर ती फणकारून म्हणली "तुम्ही? आणि नीट ? उगाच बंडला मारू नका आठवतोय तरी का कसा होता स्वेटर ? आत्ता माझ्या समाधाना साठी बोलताय संध्याकाळी याल पैसा उडवून नवीन स्वेटर घेऊन."
आता मी जरा चिडलो आणि उठून त्वरित माळ्या वरच्या bag मध्ये नीट ठेवलेला स्वेटर तिला काढून दिला आणि म्हणल ," बघ ठेवलाय की नाही मी जपून? अग!! साधा सुधा स्वेटर नाहीये हा माझ्या एकुलत्या एक बायको ने तिच्या हाताने विणलेला स्वेटर आहे हा. मला आत्ता पर्यंत दिलेलं सगळ्यात किमती प्रेझेंट आहे हे" आता मात्र स्वाती चा राग कुठल्या कुठे पळून गेला मला म्हणाली '" तुम्ही अजून हा स्वेटर जपून ठेवलाय? मला वाटलं कुठे तरी हरवला हा स्वेटर. रतन च्या वेळी माहेरी गेले होते तेंव्हा आई च्या मागे लागून लागून शिकले होते स्वेटर बनवायला. तुमच्या साठी आणि रतन साठी अगदी कौतुकाने स्वेटर केला आणि त्या नंतर कधी थंडीच पडली नाही. आई ने शिकवलेली ही शेवटची गोष्ट पूर्ण झालेला स्वेटर बघायला ही बिचारी थांबली नाही अचानक च निघून गेली ती कधी च परत न येण्यासाठी ." आता तर अतिशय अवघड प्रसंग माझ्या समोर सुरु झाला स्वाती रडू लागली. मला कुणी रडू लागले त्यातल्या त्यात कुणी स्त्री आणि ती ही स्वाती रडू लागली कि काय बोलावे ते कळतच नाही. पण मी तिला थांबवले नाही कधी कधी भावना मनात साठून राहण्या पेक्षा बाहेर पडून गेल्या कि मन मोकळ होत.
मग रतन ला हाक मारली आणि आणि काय करायचं ते समजावलं. मग काय आई च बाळ तिच्या कुशीत शिरून तिला विचारू लागलं, "आई तू homework नाही केले म्हणून बाबा नी मारलं तुला ? जशी तू मला मारतेस आणि म्हणून तू रडतेस जसा मी खोटा खोटा रडतो ? " स्वाती जरा हसली. त्या नंतर चिरंजीवांनी जरा over acting ला सुरुवात केली पठ्ठा म्हणतो काय? ," आई हे अन्याय करणारे बाबा आपल्याला नको आपण दुसरे प्रेमळ बाबा आणू " आता मात्र स्वाती खदखदून हसायला लागली. दोन मिनिटा साठी कार्ट्याला झोडपून काढावस वाटले पण स्वाती चे हसणे पाहून विचार बदलला.
स्वाती रतन ला शाळे साठी तयार करण्या साठी आत निघून गेली. जाताना मला म्हणली ," निघा आता ऑफिस ला उशीर होईल आणि संध्याकाळी लवकर या आणि हो reservation करून या उदयाच."
संध्याकाळी घरी आलो तेंव्हा माझी सगळी तयारी केलेली होती शिवाय स्वेटर ही छान धुवून घडी घालून ठेवला होता. "हे काय स्वेटर धुवून वाळला सुद्धा?" मी आश्चर्याने विचारले? रतन म्हणाला ,"आई ने शिंदे काकूंच्या Hairdryer ने सुकवला आहे स्वेटर" इतक्यात स्वाती बाहेर आले आणि तिने रतन ला बाहेर पिटाळले. मी काही बोलणार इतक्यात म्हणली," आभार प्रदर्शन नकोय मी काहीही जगावेगळ केलेलं नाहीये. तुमच्या तब्बेतीची काळजी वाटते म्हणून सकाळी बडबडले. आणि हो या डब्यात नारळा च्या वड्या केल्यात .तुमच्या मित्रांच्या आणि बाकीच्या नातेवाईक यांच्या घरी नेण्या साठी." असे म्हणून तिने खोबऱ्याच्या वडी ची वाटी हातात दिली म्हणली,"सांगा कश्या झाल्यात?"
आजू बाजूला रतन नाही हे पाहून मी तिला भरवायला सांगितले. पहिले बरेच आढेवेढे घेतले पण नंतर पटकन भरवून लाजून आत गेली. किती वर्षांनी तिला असे पाहत होतो मनाला खूप बरे वाटले.
बायाका ही नारळा सारख्या असतात ना वरून कडक आतून खोबऱ्या सारख्या गोड!!!
पण हा नारळ दररोज फुटत नाही त्याच काय????

Monday, January 16, 2012

१५ जानेवारी २०१२

१५ जानेवारी २०१२
आज अगदी उत्साहात स्वाती ने बनवलेल्या गरमा गरम गुळाच्या पोळ्या घेऊन ऑफिस ला पोचलो. दरवर्षी प्रमाणे आज ही सगळे जण डब्यावर तुटून पडणार म्हणून मनापासून खुश होतो. पण ऑफिस चा नूर काही औरच होता. आमची सहकर्मचारी शोभा जाधव च्या नवरया चे अपघाती निधन झाले होते. शोभा म्हणजे आमच्या ऑफिस ची शान!! कोणा ची मैत्रीण, कोणाची मुलगी,तर कुणाची उत्तम सहकर्मचारी. घरच्या नाजूक परिस्थिती मूळे कॉलेज चे शिक्षण सुरु असताना तिने आमच्या कंपनी मध्ये नोकरी पकडली. प्रथम clrical काम करत करत तिने तिच्या हुशारी च्या जोरावर accounts department ला बदली मिळवली. मग माझ्या सल्ल्या ने Mcom व DTL पूर्ण केले. स्वतः लग्ना साठी पैसे जमवून लग्न केले. दीड वर्ष पूर्वी च तिला मुलगी झाली होती. सगळे इतक छान चालू असताना तिच्या बाबतीत असे काही होईल असे वाटले देखील नव्हते.
ऑफिस मधले निम्मे लोक सकाळी तर निम्मे लोक संध्याकाळी भेटायला जायचे ठरले होते. मी ऑफिस ला पोचेपर्यंत निम्मे लोक पुढे गेले सुद्धा होते तेव्हा संधयाकाळी जाण्यावाचून माझ्या कडे काहीच पर्याय उरला नाही. सगळा दिवस याच टोचणी मध्ये गेला. एरवी हसणारे,खिदळणारे ऑफिस आज एकदम शांत होते. नंतर नंतर मला त्या शांततेचा ही त्रास होऊ लागला.
अखेरीस आम्ही संध्याकाळी शोभा ला भेटायला तिच्या सासरी ठाण्या ला पोचलो. घरातला कर्ता पुरुष गेलेलं घर भयाण दिसत होते. हसऱ्या आणि बोलक्या डोळ्यांची शोभा हतबल आणि आगतिक पणे नवऱ्या च्या फोटो पुढे बसली होती. दीड वर्षाची तिची मुलगी पायाशी खेळत होती. काय कळणार तिला कि सकाळी च तिचा जन्मदाता बाप तिला सोडून गेला होता. आजूबाजूला नातेवाईकांच्या घोळक्यात बसलेली शोभा एकटीच वाटली मला. मला मोठ्या भावासारखी मानणारी शोभा, तिच्या प्रत्येक प्रोब्लेम मध्ये माझा सल्ला घ्यायची पण आज मी तिच्या साठी काहीही करू शकत नव्हतो.
चौकशी केल्यावर कळले की तिचा नवरा रात्री मित्रांसोबत दारू प्यायला गेला होता. येताना त्याच्या बाईक चा ताबा सुटला आणि एका टेम्पो वर जाऊन आदळला आणि जागी च गेला. तसा दारू चा नाद नव्हता त्याला नाहीतर शोभा बोलली असती मला. मजा म्हणून इतकी प्यायला की जीवन च गमावून बसला. तो क्षणाच्या मजे साठी शोभा ला आणि त्या लेकराला उघड्यावर टाकून गेला. गेलेल्या माणसा बद्दल वीत बोलू नये पण मला त्याचा राग आला होता त्याच्या मजेसाठी त्याला अजून दोन आयुष्य बरबाद करायचा काही च अधिकार नव्हता.
शोभा च्या घरून स्टेशन कडे निघालो येताना वाटेत मला माझे मोहाचे प्रसंग आठवले आणि ते मी टाळले याचा मला अभिमान वाटत होता. त्या मूळे अनेक मित्र गमावले होते मी पण आज त्याची खंत वाटत नव्हती मला.....स्टेशन वर आलो तर ९.०७ ची दादर लोकल ठाणे स्टेशन वर उभी च होती.रात्रीची वेळ त्यात विरुद्ध दिशेचा प्रवास तेव्हा गाडीला विशेष गर्दी नव्हती. इंजिन च्या मागच्या च डब्यात बसलो.गाडी सुरु झाली. पुढे भांडूप स्टेशन ला काही रेल्वे कर्मचारी माझ्या डब्यात चढले.
रुळांची व सिग्नल ची देखरेख करणारे ते कर्मचारी होते. त्यांच्या हातात कंदील, हातोडे आणि पहार होती. त्या मधला अतिशय वयस्कर गृहस्थ साधारण ६० च्या आसपास चा वाटत होता. अतिशय किरकोळ अंगयष्टी चा तो इसम भेलाकांड्या खात च डब्यात चढला. त्याचा खांद्या वरील हातोडी जरी त्याच्या अंगावर पडली असती तरी गेला असता इतका कृश होता तो!! तो डब्यात चढला आणि डोळे मिटून समोर च्या बाकावर बसला. त्यांचे इतर दोन कर्मचारी त्याचा शेजारी बसले. चवथ्या कर्मचाऱ्याला तिथे जागा नव्हती म्हणून तो माझ्या शेजारी येऊन बसला.
तो डोळे मिटून तो गाडीचा आवाज ऐकत होता, गाडी जाताना जरा कुठे रुळाचा वेगळा आवज त्याला जाणवला की तो सोबतच्या कर्मचाऱ्यांना काही सूचना सांगत होता. काही वेळाने त्यांच्या मध्ये मजा मस्करी सुरु झाली. आणि विषय होता त्याची दारू. माझ्या शेजारील गृहस्थ त्याला म्हणाला," बाबा आज काम निट करनास नक्की च विदेशी पिऊन आला असशील देशी प्यायला असता तर कस झाक काम केले असतंस बघ!!!" मी न राहवून त्या इसमाला म्हणल,"अहो कशाला त्यांना अजून दारू प्यायला प्रवृत्त करताय ? अहो त्यांच वय बघा!! त्यांची अवस्था बघा! अशात त्यांना सावरायचं सोडून तुम्ही त्यांना अजून प्यायची फूस काय लावता?" माझ्या बोलण्या वर हसत हसत तो माणूस म्हणाला '"साहेब आम्ही कोण आलो त्याला फूस लावनारे ? आमचा बाबा वयाच्या १७ व्या वर्षी पासून पेतोय. आज त्याच्या इतक कष्टांच अन कसबी च काम आमी कुनी बी करू शकत न्हाय!! आज तो जो काही उभाय तो दारू मुळच नाही तर एखादा काव्हाच गचकला असता एवढे कष्ट केलेत बाबा न आमच्या..४ थी नापास हाय पण नॉलेज इतक हाय कि भले भले इंजिनियर पन बाबा कड सल्ला मागायला येत्यात. ३ पोरींची लग्न लावली आणि आज बी कष्टा नि बायाकुच अन पोलियो झालेल्या पोराच पोट भरतोय ते या दारू मुळच. पावन समदी च लोक मजा म्हणून नाय पेत दारू." एवढ बोलून ते सगळे कांजुरमार्ग स्टेशन ला उतरून गेले. भेल्कांड्या देत जाणाऱ्या त्या इसमा कडे मी पाहतच राहिलो.
एका दिवसात एकाच गोष्टीचे परस्पर विरोधी पैलू कधीच माझ्या समोर आले नव्हते. अस्वस्थ मनाने घरी आलो. पण अजून ही त्याच दोन घटना माझ्या मनात एकमेकांशी वाद घालत आहेत. शोभाचा संसार उध्वस्त करणारी दारू वाईट की त्या माणसाचा संसार उभा राहावा या साठी कामी येणारी दारू चांगली यात मनाचा पार गोंधळ उडला आहे.
मला वाटते कोणतीही गोष्ट वाईट नसते. ती आपण ज्या परीस्थिते मध्ये अवलंबतो त्यावर तिचे भवितव्य अवलंबून असते.
परमेश्वरा माझ्या वर अशी वेळ आणू नकोस रे बाबा!!! आणि आली तरी अशा कशा चा ही अवलंब न करता ती लढायची ताकद दे.... पण देवा तुम्ही का स्वर्ग मध्ये सोमरस पिता काही प्रोब्लेम आहे की.....???

Wednesday, January 11, 2012

२ जानेवारी २०१२
आज २०१२ चा दुसरा पण ऑफिसचा मात्र पहिला दिवस होता.काहीसा अनिच्छेने ऑफिसला पोहोचलो.डोळ्यासमोर कामाचा डोंगर दिसत होता.पण जेव्हा ऑफिसला पोचलो तेव्हा ऑफिसचा सुर काही निराळाच होता. सगळ्या ऑफिसला सुंदर पाने सजवले होते जणू कोणाचा तरी वाढदिवसचं होता.पण मला काही लक्षात येईना कोणाचा वाढदिवस आहे.मला काही झेपत नव्हते.मी जाऊन जागेवर बसलो तोच HR मधला सातपुते सांगायला आला म्हणाला,"बोरकर चला conference room मध्ये चला आज कुणीही काम करायचे नाही आज सगळ्याना एक surprize आहे"मी conference room मध्ये गेलो बघतो तर साधारण ५- १२ वयाची जवळ जवळ ३०-३५ मुले तिथे आली होती.आमच्या कंपनीने एक आख्खा अनाथ आश्रमच दत्तक घेतला होता. आणि ही सगळे मुले त्याच अनाथ आश्रमा मधली होती. सगळा दिवस ती मुले आमच्या बरोबरच राहणार होती. दिवस भर मस्त कार्यक्रम ठेवले होते आणि म्हणूनच आजचा दिवस कोणीही काम करायचे नव्हते.
मनातली मरगळ,कामाचे tension कुठल्या कुठे पळून गेले.
मग आम्ही सगळे त्या मुलांबरोबर खेळलो, चित्रे काढली, मातीच्या वस्तू बनवल्या,दुपारी त्यांच्या बरोबरच जेवलो,संध्याकाळी त्या मुलांना कंपनी कडून शालेय साहित्य देण्यात आले आणि आम्ही सर्वांनी वेगळे पैसे जमवून त्यांना आवश्यक असा प्रेशर कुकर ही त्यांना दिला.मुले तर जशी आनंदानी फुलुनच गेली होती.सहज बोलता बोलता त्यांना विचारलं कि त्यांना मोठे पाणी काय व्हायायाच आहे.तर इतकी सुंदर उत्तरे त्यांनी दिली कुणी म्हणाले आर्मी मध्ये जाणार, कुणाला microsoft मध्ये काम करायचं होते तर एका मुलीला चक्क अनाथ आश्रमाच्या ताई प्रमाणे अनाथ मुलांना सांभाळायच होते. एक एक मुलाचे विचार ऐकून क्षणभर मनात प्रश्न पडला कुठून आणि कशी या मुलांना समाज येत असेल देव च जाणे. मग वाटले ही पिढीच अशी आहे.
ट्रेन मधून जाताना मनात विचार आला कि रतन चे ही असेच काही स्वप्न असेल तर आपण त्याला सर्वतोपरी सहकार्य करायचे रात्रीचा दिवस करून मेहनत करायची पण त्याला त्याचे स्वप्ना पूर्ण करता आली पाहिजे. जर त्याने सी ए केले तर मी समजेन कि मी च त्याच्या रूपाने सी ए झालोय.अचानक पाने भारावून गेलो आणि कधी घरी आलो ते कळलेच नाही.
घरी आलो तर स्वाती आणि रतन जब वुई मेट हा सिनेमा पाहत होते. मी चार चार दा सांगितल्या नंतर माय लेक TV समोरून उठले. स्वाती आत स्वयपाक करू लागली.मी रतन ला म्हणल चल आज मी तुझा अभ्यास घेतो .असे म्हणाल्या बरोबर रतन आणि स्वाती ४४० vault चा झटका बसल्या प्रमाणे बघत राहिले.स्वाती ने रतन ची वह्या पुस्तके मला दिली. तो त्याचा त्याचा अभ्यास करू लागला. मला खदखदत असणारा प्रश्न अखेर मी रतन ला विचारला," रतन मला सांग तुला मोठा झाला कि काय व्हायचं आहे?"
त्यावर क्षणाचा ही विलंब न करता तो म्हणाला," ह्रिथिक रोशन" जी उत्तरे माझे कान ऐकून आले होते त्यात हे उत्तर दूर दूर वर ही नव्हते.हे ऐकल्या बरोबर स्वाती मात्र शिवबा ने गड जिंकल्या नंतर जिजाऊ ज्या आनंदाने बाहेर आल्या असतील त्या आनंदाने आली आणि रतन कडे पाहू लागली त्याला म्हणाली,"तू star आणि मी तुझी starmother हो हो जरूर हो अरे ह्रीथिक काय? त्याच्या ही पेक्षा मोठा star होशील तु?" मी माय लेकाचा कौतुक सोहळा पाहून थक्क झालो.मी स्वातीला म्हणल,"आग स्वाती काय हे? तो काही तरी वेड्या सारखा बोलतोय आणि त्याला ओरडायच सोडून त्याला खतपाणी घालते आहेस.आपल्याला झेपतील अशीच स्वप्ने पहावीत माणसाने" पण ती काहीही ऐकायच्या मनस्थितीच नव्हती. तिने मला चं पटवून द्यायला सुरुवात केली कि रतन मध्ये कसे स्टार होण्या चे कलागुण आहेत आणि स्टार चे आई वडील किती सुख आणि प्रसिद्धी चा आनंद उपभोगतात.या सगळ्या मध्ये रतन मात्र मस्त पैकी आमची नजर चुकवून खाली खेळायला गेला. गेला तो गेला आणि थेट जेवायला चं उगवला. मग काय जेवला आणि सकाळ ची शाळा म्हणून स्वाती आणि रतन झोपून गेले. आणि मी ही दोघा समोर हात टेकले.
पण माझ्या संकल्पाला पहिल्याच दिवशी इतका चांगला प्रसंग लिहायला मिळाला या विचाराने मन खुश झाले. नवीन कोऱ्या डायरीच्या पानावर खूप दिवसांनी "मराठी" मध्ये काही तरी लिहितो आहे. दिवसभर त्या मुलां बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण त्याचे सुख शब्दात मांडणे खरच अशक्य आहे. पण आज मनाला खात्री वाटते आहे की हे वर्ष छान जाणार कारण सुरवात चं इतकी सुंदर आणि आशादायक झाली आहे.आज कोणी तरी माझ्या मुळे आनंन्दी झाले होते. आज एका जीवाला तरी माझ्या मुळे त्याचे भविष्य एक चांगले नागरिक म्हणून जगायला मदत होणार आहे हे समाधान येणाऱ्या सुखी वर्षाची चं नांदी आहे. चला आता मात्र झोपायला हवे उद्यापासून month end चे काम नवीन जोमाने करायचे आहेत.भगवंता देणार असशील तर येणारा दिवस सहन करायची शक्ती दे रे बाबा !!!
प्रास्ताविक...
जेव्हा मी ब्लॉग लिहू लागलो तेव्हा काही दिवसांनी जाणवले कि आपल्या अवती भोवती च्या बऱ्याच गोष्टी बद्दल अनेक जण आपापल्या दृष्टीकोनातून लिहित असतात. आपण जे विचार मांडतो त्यातून आपले व्यक्तिमत्व समोर येते आणि मग विचार केला जर घटना एक पण त्यावर विचार करणारे,मत मांडणारे व्यक्तिमत्व जर वेगळे असेल तर किती मजा येईल ना?
म्हणून या नवीन वर्षा मध्ये मुंबई मध्ये राहणारे श्रीयुत बोरकर आपल्या भेटील...ा त्यांची डायरी घेऊन भेटायला येणार आहेत.तसे बोरकर अगदी सर्व सामान्य सारखे चाकरमाने आहेत तेव्हा रोज डायरी लिहिणे त्यांना परवडणारे नाहीये पण त्यांनी या वर्षी एक संकल्प केला आहे कि ज्या दिवशी त्यांना एखादी संस्मरणीय घटना आपल्या आयुष्यात झाली आहे असा साक्षात्कार होईल त्या दिवशी ते नक्की डायरी लिहिणार आहेत आणि पर्यायानी तुम्हाला हि ती वाचायला मिळेल.
खर म्हणजे बोरकर ही व्यक्तिरेखा मला "व पु काळे" यांच्या "मायाबाजार" या कथेत सापडली जेव्हा मी कॉलेज मध्ये नाटक करत होतो तेव्हा. त्या वेळेस आम्ही भूमिके चा अभ्यास नीट व्हावा म्हणून त्या त्या पात्राची डायरी लिहायचो.त्या वेळी त्या पात्राच्या दृष्टीने विचार करताना आणि शब्दात मांडताना वेगळीच मजा यायची.ती मजा तो आनंद पुन्हा अनुभवण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करतो आहे. माझी आशा आहे की तुम्हाला ही तो नक्की आवडेल याची मला खात्री वाटते आहे.तेव्हा आज पासून बोरकर तुमच्या भेटीला येतील हे नक्की.
बर बोरकरां बद्दल सांगायचे झाले तर नाव आनंद विलास बोरकर वय ४० वर्षे राहणार दादर मधील चाळ वजा बिल्डींग मधे.घरात त्यांची पत्नी स्वाती आहे जी उत्तम "चाळ गृहिणी"(आता चाळ गृहिणी म्हणजे तिच्यात कोणते गुण असतील हे वेगळे सांगायला नको... असो...) त्यांना एक मुलगा आहे दहा वर्षांचा जो त्यांना लग्नाच्या ५ वर्ष नंतर झाला असल्याने त्यांच्या पत्नीने त्याचे नाव "रतन"ठेवले(खर तर त्याना त्याचे नाव"कोहिनूर"किंवा"हिरा"ठेवायचे होते पण त्याची तहान त्याने रतन या नावावर भागवली)तर असे आहे बोरकरांचे छोटेसे कुटुंब.अजून बोरकरां बद्दल सांगायचे झाले तर बोरकर बी. कॉम. पर्यंत शिकले नंतर सी.ए.चे शिक्षण ही सुरु केले परंतु वडिलांचे निधन आणि घरच्या परिस्थितीमूळे ते अर्ध्यात सोडले व एका प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी पकडली जे ते अजून ही इमानदारीने करत आहेत. तर असे हे बोरकर ना जुन्यातले जुने ना नव्यातले नवे...मधेच कुठेसे अडकलेले.ना जुन्या विचारांना सोडता येते ना नवीन विचार आत्मसात करता येतात. त्यांची ही डायरी. त्यांचा दृष्टीकोन,विचार,व्यथा,घुसमट कुठे तरी तुम्हाला ही आपल्याश्या वाटतील.तेव्हा या पुढचा प्रवास बोरकरांच्या डायरी च्या एका पानावरून पुढे सरकेल ज्या मध्ये तुमची साथ अतिशय मोलाची आहे आणि जी तुम्ही द्याल अशी मला आशा आहे.....
अधिष