Tuesday, March 6, 2012

२९ फेब्रुवारी २०१२

आजचा दिवस काहीसा नकारात्मक भावनेने च सुरु केला कारण एक तर आज २९ फेब्रुवारी म्हणजे बाकी च्या फेब्रुवारी महिन्यात पगार लवकर मिळायचा जो आनंद होत असतो त्या च्या मधला मोठ्ठा अडसर आणि दूसर म्हणजे आज आम्हाला हीच्या आत्या कडे डोंबिवली ला जेवायला बोलावले होते. एक तर ही च्या आत्याना  ऐकू कमी येत आणि मी गेलो कि त्यांना गप्पा मारायचा एकदम चेव येतो आणि ओरडून बोलून बोलून माझा घसा मात्र कामातून जातो.
तेंव्हा आज ऑफिस मधून हाफ डे राजा टाकून घरी आलो. पाच ला रतन शाळेतून आल्या बरोबर लगेच निघालो. लवकर निघालो त्यामुळे ट्रेन ला ही जास्त गर्दी मिळाली नाही.मी रतन आणि स्वाती बसलो होतो. तोच तिथे रतन च्या च वयाचा एक मुलगा हातात काही बाराखडी, गोष्टींची आणि चित्रे रंगवण्याची पुस्तके विकायला आला. आम्ही तिघे बसलेलो बघून आमच्या सीट पाशी आला. मला म्हणाला, "साहेब देऊ का A B C D ? , गोष्टी इसापनीती...?" रतन ने स्वाती कडे आशाळभूत पणे पहिले तोच स्वाती ने त्याला डोळ्यानीच जे काय सांगायचं ते सांगितले. रतन चिडून खिडकी बाहेर पाहू लागला. तो मुलगा काही च न झाल्या प्रमाणे पुढे निघून गेला. माझी नजर मात्र त्याच्यावर च खिळून राहिली. तो प्रत्येका पाशी जाऊन विचारत होता. तो सगळा डबा पालथा घालून पुन्हा आमच्या इथून जाऊ लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं "काय रे एवढी A B C D ,गोष्टींची पुस्तके विकतो आहेस पण स्वतः शाळेत जातोस का? त्या वर तो म्हणाला " ओ साहेब घ्यायचं असेल तर घ्याना उगाच वेळ का घालवताय" असे म्हणून तो गेला. पण मला अजिबात त्याचा राग आला नाही. कारण ज्या हिम्मतीने तो न थकता कोणत्याही नकाराची परवा न करता तेवढ्याच कष्टाने पुढचा प्रयत्न करत होता. त्याच्यातली ती जिद्द, ती नकार सहन करायची शक्ती आमच्या रतन ला किमान १०% तरी मिळावी असे क्षणभर वाटून गेले.
आत्यांकडे गेलो तिथे त्यांचा US return मुलगा,त्याची बायको आणि त्यांची ५ वर्षांची मुलगी होती. सुट्टीसाठी इकडे आले होते म्हणून आत्यांनी आम्हाला जेवायला बोलावले होते.त्यांची ती मुलगी कुठलेसे अमेरिकन चोकलेट  चघळत बसली होती. काही वेळाने ते संपले तसे तिनी भोकाड पसरले तिला तसेच चोकलेट पुन्हा हवे होते. दुर्भाग्य म्हणजे नेमके ते चोकलेट संपले होते. पोरीचे रडणे काही थांबेना आणि सगळ घर दार तिच्या मागे समजूत घालत फिरत होते. शेवटी महाप्रयत्ना नंतर ती शांत झाली आणि आम्ही जेवायला बसलो.एरवी आत्यांशी बोलून घसा दुखतो आज या पोरीने कानाचे पार बारा वाजवले.
घरी येताना ट्रेन मध्ये बसताच तो पुस्तक विकणारा मुलगा आठवला. आज एका चोकलेट च्या हटटा पायी समजूत घालणारे आम्ही सगळे तिकडे या मुलाच्या मुलभूत गरजा बघणारे ही कुणी नाही. काय तफावत आहे नाही आपल्या देशात. आपण खूपच सामान्य असल्याची टोचणी मनाला लागली स्टेशन मधून बाहेर पडलो तोच बाहेर एका नुकत्याच विजयी झालेल्या आमदाराचा विजयी मुद्रेतील मोठठां flex लावला होता. त्याच्या खाली येणाऱ्या पाच वर्षातील विकास कामांची यादी त्याने दिली होती. मनात विचार आला आपण सामान्य आहोत पण ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या तरी विकास आराखड्यात कुठे या मुलांचा विकास लिहिला आहे.
शेवटी विचार करायचा नाही म्हणल तरी डोक ऐकत नाही त्याच काय ?  जाऊदे ज्याच त्याच नशीब एवढाच आपण म्हणून शकतो.
भगवंता श्रीमंत नाही पण चांगल्या खात्या पित्या घरात जन्माला घातलेस याचे आभार रे बाबा.....

2 comments:

  1. Bhariiii! Patlela ahe....Borkar kakana ek na ek divas hero banavach lagel yaar!

    ReplyDelete
  2. Ha ha honar ek diwas borkar nakki hero honar

    ReplyDelete